आज रविवार. उशिरा उठायचे म्हटले तरी, अण्णा झोपून देतात होय? आजचा टाईम्स पुरवणी सकट असतो. शेजारच्या बोकीलांचा मागून आणला दिड तास वाचण्यातच गेला. नेहरुंच्या लेखांच पुस्तक तू वाचायला हवस अस सोमण्या बोलला होता. आज लायब्ररी बंद. उद्या परवा आणू.
सलूनमध्ये गेलो तर हिss गर्दी. परत येईतो दिड तास मोडला. दुपारी झोप काढीन म्हणतो तर, तिर्थरुपांनी नोकरी शोधण्याचा सल्ला दिला, तसाच उठलो..भास्करला घेउन त्याच्या मेहुण्याकडे.. तो खटपट करतो म्हणालाय पण कसचं काय? खटपट करायचीच असती तर भास्करसाठी नसती का केली?
उद्या बैजू बावरा बघून येउ अस भास्कर बोललाय.बघू!
~~~~~****~~~~~
आजचा दिवस सोनियाचाच म्हणायचा! मिस साठे बिना मंगळसूत्राच्या कॉलेजमध्ये अवतिर्ण झाल्या. सुळसुळीत रेशिम मध्ये असणार्या मिस बिनीवाले पेक्षा आपल्याला फ़िक्कट निळ्या वायल मधली मंदाकिनी साठे अधिक भावते. (सुंदर वाक्य! आपण लेखक म्हणून हातपाय मारण्यास हरकत नाही)
मैत्रिणींकडून बुडलेल्या अभ्यासाच्या वह्या घेत होती. आपण पहिल्या नंबरात वगैरे असतो तर आज माझी वही तिच्या हातात असती.. मित्रांनी माझ्याकडून चहा उकळला.
घरी येताना बाबूरावांच्या जुन्या पुस्तकाच्या दुकानात चक्कर टाकली. फ़ेब्रुवारी महिन्याच्या इंडिया मासिकाचा अंक मिळाला. चेपौक येथे इंग्लंडविरुध्द जिंकलेल्या पहिल्या टेस्ट मॅचचा इतिवृत्तांत आणि त्याला पुढे येणारा राजकिय रंग याबद्द्ल माहिती दिलेली होती. आता बघा लेको, भारत याही क्षेत्रात चमकणार.
~~~~~****~~~~~~
सुधीरची रोज शिकवणी घेण्याबद्दल अण्णा बजावत होते. मी कधी घेऊ? सकाळ दुपारचा वेळ कॉलेजमेध्येच मोडतो. संध्याकाळी भास्कर, सोमण बरोबर चर्चा फ़िरणे होते. मग मी अभ्यास कधी करायचा? आणि म्हणे यांना मी प्रथम श्रेणीतच उत्तीर्ण व्हायला हवे! वेळ मिळेल तस शिकवेन सांगितलनं, मोकळा झालो. पाठचा भाऊ पण माया म्हणोन नाही. तिर्हाईतासारखा वागतो.
सोमण नेहरुंच्या पुस्तकावर आज बराच भाव खात होता. तो निघून गेल्यावर भास्कर जवळ बोललो. त्यालाही तसेच वाटले.
कुठुनही ते पुस्तक मिळवेन आणि सोमण्याच्या तोंडावर मोठी मोठी वाक्ये टाकेन.. पण आज लायब्ररीत जाण्यास कंटाळा केला.
उद्या नक्की जाईन.
~~~~~****~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
style is same as in "Lavhali" by S N Pendase. ( Shri Na Pendase)
ReplyDelete